Breaking News

शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (शिवशक्ती टाइम्स न्युज )

साकुरी गावात पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, डॉ.सुभाष भामरे व खासदार डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे यांच्यासह हजारो लोकांनी घेतले भावपूर्ण अंतीम दर्शन

शहीद सचिन मोरे ‘अमर रहे’ ‘भारत माता की जय’ घोषणा आणि साश्रृनयनांनी या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला.

 

मालेगाव, दि. 27  (उमाका वृत्तसेवा)  शिवशक्ती टाइम्स न्युज  (आनंद दाभाडे ) :– इंजिनिअरींग रेजीमेंट-115 मध्ये अभियंता पदावर कार्यरत असलेले शहीद वीरजवान सचिन विक्रम मोरे यांच्यावर सकाळी 12:00 वाजता त्यांच्या मुळगावी साकुरी (झाप) ता.मालेगांव जिल्हा नाशिक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.सुभाष भामरे, डॉ.भारती पवार, आमदार सुहास कांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ,जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.आरती सिंग, महानगरपालिकेचे उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद जाधव, पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, डॉ.तुषार शेवाळे, यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शहीद जवान सचिन मोरे यांना श्रध्दांजली वाहिली.

सैन्यदलाचे दोन मेजर, एक ज्युनिअर कमिशन ऑफीसर आणि वीस जवान यांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ व कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे व सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने कल्याण संघटक अविनाश रसाळ यांनी पुष्पचक्र अर्पण केले.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुरी या गावचे सचिन मोरे हे 17 वर्षापासून भारतीय सेनेत कार्यरत होते. ते सैन्यदलात अभियंता पदावर कार्यरत होते. दोन्ही देशांच्या सीमेवर पूल व रस्ते बनवण्याचे काम सुरू असतांना अचानक चीनकडून गलवाण नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे सोबतचे काही जवानांना वाचविण्याच्या प्रयत्नात सचिन मोरे यांना वीरमरण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचे पार्थिव पुणे येथे आणल्यानंतर तेथे लष्कराच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. तेथून त्यांचे पार्थिव हे त्यांच्या मालेगाव येथील साकुरी मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात आले. शनिवारी साकुरी गाव व पंचक्रोशीतील तसेच तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केली होती. करोना महामारीची छाया असतानाही आपल्या परिसरातील लाडक्या जवानाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गावकर्यां नी ‘भारत माता की जय’ ‘अमर रहे’ यासारख्या घोषणा देऊन विरपुत्रांला दुपारी 12:00 वाजता अखेरचा निरोप देण्यात आला.

शहीद जवान सचिन मोरे यांच्या पश्चात वडील विक्रम मोहन मोरे, आई जिजाबाई विक्रम मोरे, पत्नी सारिका सचिन मोरे, मुलगी आर्या, अनुष्का व अवघ्या सात महिन्याचा मुलगा कार्तिक तर भाऊ योगेश व नितीन असा परिवार आहे. अलिबाग येथे 2003 मध्ये झालेल्या सैनिक भरतीमध्ये सैन्यदलात भरती झालेला शहीद जवान सचिन मोरे सध्या एस.पी.115 रेजीमेंटमध्ये कार्यरत होता. सैनिकीसेवेत 17 वर्ष पूर्ण झाल्याने नुकताच फेब्रुवारी महिन्यात आपल्या मूळगावी आला होता. सेवेचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याने आपण यापुढेही देशसेवा करणार असल्याच्या भावनाही त्यांनी कुटूंबाकडे व्यक्त केल्या होत्या. मनमिळावू स्वभावाचे शहीद जवान सचिन मोरे अचानक निघुन गेल्यामुळे संपूर्ण साकुरीसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. ‘अमर रहे अमर रहे सचिन भाऊ अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ च्या जयघोषात संपुर्ण परिसर शोकसागरात बुडाला होता.

शहीद जवानाच्या कुटूंबाच्या समस्या सोडविण्यासाठी
महाराष्ट्र शासन अग्रेसर राहिल : पालकमंत्री भुजबळ

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, हिमालयाच्या कुशीत ज्या ठिकाणी पाणी व रक्त गोठून जाते अशा ठिकाणी भारतमातेच्या संरक्षणासाठी आमचे जवान सदैव कार्यरत आहेत, ते सीमेवर आहेत म्हणून आज आपण इथे स्वातंत्र्य भोगत आहोत. आज युध्दजन्य परिस्थिती उभी ठाकली असतांना आमचे नवजवान चीनी गनिमाला ठणकावून सांगतात, खबरदार जर टाच मारूनी याल पुढे, चिंधड्या उडविन राई राई. अशा भावना उराशी बाळगून आपले सैनिक आज देशाच्या सीमेचे रक्षण करित असून अशा सर्व सैनिकांना अभिवादन करतांना शहीद जवान सचिन मोरे यांच्या कुटूंबाच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन अग्रेसर राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनासह मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी श्रध्दांजली वाहिली.

शहीद जवान मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : मंत्री दादाजी भुसे

गलवान खोऱ्यात आपल्या सहकार्यांचा जीव वाचवितांना वीरमरण आलेले शहीद जवान सचिन विक्रम मोरे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. याचा भारतीय लष्करातर्फे निश्चित बदला घेतला जाईल, आणि हीच खरी शहीद सचिन मोरे यांना श्रध्दांजली ठरेल असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले. पुढे बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, मालेगांव तालुक्याचे भूमिपुत्र शहीद जवान सचिन मोरे यांच्यावर चीनने केलेल्या कुरघोडीचा मी निषेध करतो, शहीद सचिन विक्रम मोरे यांना सैन्य दलात भरती करणारे वीरपिता विक्रम मोरे व वीरमाता जिजाबाई मोरे यांचा मालेगांव तालुक्यालाच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे व खासदार डॉ.भारती पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली.

शिवशक्ती टाइम्स परिवाराकडून या वीर जवानास भावपूर्ण श्रद्धांजली

About Shivshakti Times

Check Also

कृषिरत्न फाउंडेशनतर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते व साडीचोळी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी …

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *