कोरोनावर मात करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 30 जून: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी आज आदेश काढले आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू असणार आहे. त्यामूळे 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यास मज्जाव आहे.कोरोना आजारात सातत्याने वाढ होत असून 95 पर्यंत कोरोना रूग्ण झाले आहेत.त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
सार्वजनिक स्थळी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. परंतु तिथे पाचपेक्षा कमी व्यक्ती एकत्र येत असेल त्यावेळी त्यांचे कमीत कमी 6 फूट सामाजिक अंतर राखणे आवश्यक राहील.सार्वजनिक ठिकाणी, स्थळी पान,तंबाखू,धूम्रपान करणे इत्यादी प्रतिबंध राहील.
धार्मिक स्वरूपाचे समुपदेशन धर्मपरिषद धार्मिक गर्दीचे आयोजन करू नये.कोरोना विषाणूच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात जनमानसात अफवा अपप्रचार व भीती व्हाट्सअप फेसबूक,ट्विटर, वृत्तपत्र, सोशल मीडिया व होर्डिंग इत्यादी वर प्रसारित करू नये तसेच अधिकृत माध्यमाद्वारे माहिती न घेता दिशाभूल करणारी माहिती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नये.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने घोषित करण्यात आलेल्या क्वारटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरातर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणूक,रॅली, सामूहिक कार्यक्रम ,समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण-उत्सव ,उरूस ,जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा, आंदोलने इ.यांना मनाई राहील.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये, कार्यशाळा ,प्रशिक्षण वर्ग,देशांतर्गत व परदेशी सहल यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सुपरमार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब,पब, क्रीडांगणे, मैदाने,जलतरण, तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा ,संग्रहालये ,गुटखा तंबाखू, पान विक्री इत्यादी बंद राहील.
निवासाची सोय असलेले सर्व हॉटेल,लॉज,खाजगी विश्रामगृह बंद राहतील.सामाजिक अंतर ठेवून दैनंदिन बाजार भरवता येईल परंतु आठवडी बाजार भरविता येणार नाही.