Breaking News

ॲण्टीजेन टेस्टिंग, संस्थात्मक विलगीकरण वाढवावे – आरोग्य मंत्री राजेश टोपे

शिवशक्ती टाइम्स न्युज – संचारबंदीचे काटेकोर पालन करत कोरोनाची साखळी तोडण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

औरंगाबाद (जिमाका) – (प्रतिनिधी – युसूफ पठाण )  दि. 09 :-जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ॲण्टीजेन टेस्टिंग वाढवावे. तसेच संसर्ग वेळीच रोखण्यासाठी प्राधान्याने संस्थात्मक विलगीकरणाची संख्या तातडीने वाढवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. बैठकीस राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, डॉ. जी.एम. गायकवाड, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, औषध विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री श्री. टोपे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रूग्णांचे वेळेत निदान होणे आवश्यक असल्याने सर्वेक्षणावर अधिक भर द्यावा. ॲण्टीजेन टेस्टींगमूळे तासाभरात अहवाल मिळत असल्याने रूग्णांचे वेळेत निदान होऊन रूग्ण चांगल्या स्थितीत असतांना त्याच्यावर उपचार करणे शक्य होते. परिणामी मृत्यूदरातही घट होते. त्यादृष्टीने सर्वेक्षण, ॲण्टीजेन टेस्टिंग आणि संस्थात्मक विलगीकरण या तिन्ही बाबी तातडीने अधिक व्यापक करण्याचे, निर्देश श्री. टोपे यांनी दिले.
तसेच खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक आहे, त्यावर प्रशासनाने प्रभावी नियंत्रण ठेवावे. संस्थात्मक विलगीकरण कक्षांची संख्या वाढवावी. त्या ठिकाणी सर्व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रूग्णाचे वेळेत निदान होण्याच्या दृष्टिने विलगीकरण खूप उपयुक्त ठरते, त्यादृष्टीने रूग्णांच्या संपर्कातील सर्व संशयित व्यक्ती शोधून संस्थात्मक विलगीकरणात पूर्ण देखरेखीखाली ठेवाव्यात, असे निर्देशीत करून श्री. टोपे यांनी सर्व रूग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि स्क्रिन सुविधा ठेवावी. जेणेकरून रूग्णांच्या नातेवाईकाला नियमित आपल्या रूग्णांला पाहता येईल तसेच रूग्णांना देखील त्यामूळे मानसिक आधार मिळेल. त्याचप्रमाणे सर्व रूग्णांना वरिष्ठ डॉक्टरांनी नियमित आणि सातत्याने तपासणे, रूग्णांच्या तब्येतीमधील बदल नियंत्रित करणे गरजेचे आहे. रूग्ण बरे होण्यामध्ये आयसीयु केअर हा घटक सर्वाधिक महत्वाचा आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. याठिकाणी रूग्ण बरे होण्यासाठी उपयुक्त ठरणारे इंजेक्शन, औषधसाठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत असून तातडीने प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देऊन श्री. टोपे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 ते 18 जूलैच्या संचार बंदीचे कडक पालन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी संचारबंदीची मागणी लोकप्रतीनिधी, जनतेतूनही होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासह सर्वांनी जनसहभागातून 10 ते 18 जूलै दरम्यान संचारबंदीची यशस्वी अंमलबजावणी करावी. जेणेकरून कोरोना संसर्ग आपल्याला रोखता येईल. त्यासोबतच या संचारबंदीत चाचण्या आणि सर्वेक्षणाचे प्रमाण वाढवावे. कोरोनासंसर्गात मृत्यू दर शून्यावर आणण्याचे आव्हान आपल्या समोर आहे, त्यादृष्टीने विलगीकरण कक्षांची, आरोग्य सुविधांची वाढ करण्याचे निर्देश श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी सांगितले ग्रामीण भागात संसर्ग आटोक्यात आणण्यासाठींच्या प्रयत्नांना यश मिळत असून लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीची संख्या वाढवण्यात आली असून ॲण्टीजेन टेस्टिंग आणि सर्व परिसराचे सर्वेक्षण यामूळे रूग्णाचे निदान आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. डिसीएचसीमध्ये 1698 खाटा तर सीसीसीमध्ये 8 हजार 180 खाटा उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे खाजगी रूग्णालयांतही मोठ्या प्रमाणात खाटा, आयसीयु सुविधा उपलब्ध आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक नियमानूसार खाजगी रूग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या देयकांच्या तपासणीसाठी लेखापरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगून सध्याचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण येत्या काही दिवसात अधिक करण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री. चौधरी यांनी यावेळी दिली.
मनपा आयुक्त श्री. पाण्डेय यांनी या संचार बंदीच्या काळात मनपातर्फे 15 पथकाव्दारे ॲण्टीजेन टेस्टिंग करण्याचे प्रमाण अधिक गतिमान करण्यात येणार आहे. सध्या दरदिवशी सरासरी 900 स्वॅब तपासण्यात येत आहेत. यामध्ये कंटेंनमेंट झोनसह सर्व इतर परिसरातील सर्वांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आशा सेविका, शिक्षक यांच्या पथकाव्दारे दररोज थर्मामिटर, ऑक्सिमिटरव्दारे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच शहरातील सहा सीसीसीमध्ये 1100 खाटा उपलब्ध असून त्यापैकी 800 खाटा सध्या भरलेल्या आहेत. तर संस्थात्मक विलगीकरण कक्षात 2 हजार 220 खाटा असून त्यापैकी 688 खाटा भरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे माझे आरोग्य माझ्या हाती या ॲपव्दारे सकाळ, दुपार, संध्याकाळ नागरिकांना उपलब्ध खाटा, भरलेल्या खाटा, चाचण्यांची संख्या इत्यादी माहिती दिल्या जात असून आतापर्यंत 1 लाखापेक्षा अधिकहून लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले असल्याचे सांगून श्री. पाण्डेय यांनी शहरात लॉकडाऊननंतर रूग्ण संख्येत वाढ होत गेली असून त्याप्रमाणात यंत्रणेमार्फत व्यापक प्रमाणात राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
डॉ. येळीकर यांनी घाटीमध्ये प्रयोगशाळेत दररोज 900 च्या वर स्वॅब तपासण्यात येत असून ही प्रयोगशाळा 24X7 तत्वावर सूरू आहे. याठिकाणी 456 खाटांपैकी 324 खाटा भरलेल्या असून घाटीमध्ये दाखल होणाऱ्या गंभिर रूग्णांचा बरे होण्याचा दर हा 14% इतका आहे. संस्थात्मक विलगीकरणामूळे मोठ्या प्रमाणात रूग्ण वेळेत चांगल्या स्थितीत उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच घाटीत प्लाझ्मा थेरपी उपचार सुरू करण्यासाठी एनआयव्हीकडे सॅम्पल पाठवण्यासाठी त्यांची परवानगी मिळाली म्हणजे प्रक्रिया सुरू करता येईल. प्लाझ्मा थेरपी सूरू करण्याच्या चाचणीसाठी जिवंत विषाणू लागतो आणि ही चाचणी फक्त एनआयव्हीमध्येच होऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे सॅम्पल तपासणी झाल्यानंतर घाटीत लगेच उपचार प्रक्रिया सुरू करता येईल, अशी माहिती डॉ. येळीकर यांनी दिली.
डॉ. भट्टाचार्य यांनी घाटीतून आतापर्यंत 405 गंभीर स्थितीतील रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 45 आयसीयु असून वरिष्ठ डॉक्टरांकडून नियमित रूग्णांची तपासणी, विचारपूस केल्या जाते. त्याच प्रमाणे रूग्णांच्या नातेवाईक यांच्या सोबतही हे डॉक्टर संवाद साधतात. तसेच या ठिकाणी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तांत्रिक , प्रशासकीय बाबींची पुर्तता झाली असून एनआयव्हीच्या सॅम्पल चाचणी नंतर लगेच उपचार सुरू करता येतील असे सांगितले.
डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी जिल्हा रूग्णालयातून आतापर्यंत 784 रूग्ण बरे होऊन घरी गेले असून येथील खाटांची संख्या 200 पर्यंत वाढवण्यात येत आहे. तसेच इएसआयसीच्या सेंटरमध्येही कोविड उपचार सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.
पोलीस आयुक्त श्री. प्रसाद यांनी संचारबंदीच्या दृष्टीने पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या तयारीबाबतची माहिती यावेळी दिली.

About Shivshakti Times

Check Also

जिल्ह्यातील पिकांचे तातडीने पंचनामे करावीत – कृषी मंत्री दादाजी भुसे

• महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा तातडीने लाभ द्यावा • रानभाज्या विक्री व्यवस्था सातत्याने सुरु ठेवावी …

पीक विम्याबाबत विमा कंपनीला देखील कळवा : दादाजी भुसे

प्रतिनिधी – यूसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : मागील काही दिवसांत …

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करा – पालकमंत्री सुभाष देसाई

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि पाणी पुरवठा योजनेची कामे सुरू करा शिवशक्ती टाइम्स न्यूज  –  प्रतिनिधी – …

Leave a Reply

Your email address will not be published.