शिवशक्ती टाइम्स न्यूज
धुळे – (प्रतिनिधी-युसूफ पठाण ) शहरातील महाकाली मंदिराजवळ एका 35 वर्षीय इसमाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली आहे, मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. यानंतर पोलिसांना माहिती मिळताच डीवायएसपी सचिन हिरे हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
धुळे शहरातील गरुड कॉम्प्लेक्स येथील एका कुरियर दुकानात काम करणारा जितेंद्र शिवाजी मोरे हा रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला होता, मात्र त्यानंतर तो घरी पोहचलाच नाही. सकाळी जितेंद्र मोरे (वय 35) याचा मृतदेह शहरातील महाकाली माता मंदिराजवळ आढळून आला. तसेच जितेंद्र मोरे यांची दुचाकी पांझरा नदीपात्रात आढळून आली आहे. जितेंद्र मोरे यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह धाव घेऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब सह श्वानपथक दाखल झाले होते. मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. जितेंद्र मोरे हे कुरियर दुकानात काम करत होते, त्यांच्या खुनामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.