Breaking News

श्रम हाच देव मानून काम करण्याची आवश्यकता; येणाऱ्या काळात उद्योग जगतात अनेक नव्या संधी चालून येणार-पालकमंत्री छगन भुजबळ

शिवशक्ती टाइम्स न्यूज (युसूफ पठाण )- नवउद्योजकांनी श्रम हाच देव मानून काम करण्याची आवश्यकता आहे; येणाऱ्या काळात उद्योग जगतात अनेक नव्या संधी चालून येणार आहे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ते जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शनासाठी ‘चला उद्योजक होऊया’ या कार्यक्रमांतर्गत ‘नवयुगच्या उद्योग संधी’ या विषयावर दृकश्राव्य माध्यमातुन उद्घाटनपर भाषणात बोलत होते. यावेळी दृकश्राव्य बैठकीत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाने, सहायक आयुक्त संपत चाटे, उद्योगवर्धिनी या उद्योग संस्थेचे संचालक सुनील चांडक आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कौशल्य विकास विभागाच्या वतीने उद्योजकता विकासाबाबत मार्गदर्शनासाठी ‘चला उद्योजक होऊया’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला असून दर महिन्यात किमान एकदा प्रेरणादायी वक्ते आणून नवउद्योजकांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आज ‘नवयुगाच्या उद्योग संधी’ या विषयावर मार्गदर्शन होणार असून हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे.

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मध्ये कुटीर, लघु माध्यमे व मोठ्या उद्योगांकरिता अनेक सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत. त्यांचा सुयोग्य पद्धतीने वापर करून तरुण वर्ग नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा होईल. राज्यात एक मोठं अर्थचक्र निर्माण होण्यास वाव आहे.
उद्योग क्षेत्रात येणाऱ्या नवं उद्योजकांनी आपले खांदे मजबूत करून धाडस करावं, हे धाडस निर्माण करण्यासाठी या ऑनलाईन सत्रातून प्रेरणा मिळण्यास मदत होईल. लॉकडाऊन उठल्यानंतर ज्या ठिकाणी कामाची पोकळी निर्माण झालेली असेल त्या ठिकाणी ती भरून निघण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशातील प्रमुख उद्योगपती अझिज प्रेमजी, धीरूभाई अंबानी, नारायण मूर्ती यांनी छोटा व्यवसाय सुरू करून आज देशातील प्रमुख उद्योजक म्हणून त्यांचे नाव घेतले जात असल्याने त्यांच्याकडून न्यूनगंड न ठेवता काम करण्याची प्रेरणा घेऊन तरुणांनी काम करायला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपायुक्त सुनील सैंदाने यांनी, फेसबुकच्या माध्यमातून लाइव्ह स्वरूपात नव उद्योजकांना मोफत मार्गदर्शन देण्यात येणारी ऑनलाईन मार्गदर्शन शृंखला प्रत्येक महिन्यात किमान एकदा सुरू करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्याने सुरू केलेला हा पॅटर्न राज्यभर पोहचत आहे. यातून नवउद्योजकांना कोणत्या क्षेत्रात संधी आहे याची माहिती तसेच मार्गदर्शन केले जाणार आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचा जास्तीत जास्त नव उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सैंदाने यांनी यावेळी केले.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.