गंगाखेड विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी मागितली लाच
परभणी : प्रतिनिधी
गंगाखेड नगरपरिषद येथील विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी साडेचार लाख रुपयांची रक्कम ८ सप्टेंबर रोजी लाच म्हणून स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्यासह परभणीच्या नगरविकास विभागातील अव्वल कारकून श्रीकांत करभाजने आणि गंगाखेड नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्यूम या तिघांना ताब्यात घेतले असून, तिघांविरुद्धही नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड येथील विकास कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद विभागात दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रस्तावाच्या रकमेच्या दीड टक्के या प्रमाणे ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने ७ आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी अव्वल कारकून श्रीकांत करभाजने, अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्युम यांनी तक्रारदाराकडे साडेचार लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारास निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या समक्ष हजर केले असता स्वाती सूर्यवंशी यांनी रक्कम स्वीकारण्यासाठी संमती दिली.त्यामुळे आज ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला. त्यावेळी अव्वल कारकून श्रीकांत विलासराव करभाजने यांच्या सांगण्यावरुन गंगाखेड नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्युम यांनी साडेचार लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. ही लाच निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरुन स्वीारल्याने तिन्ही आरोपींना स्वीकारलेल्या रक्कमेसह एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.