Breaking News

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत पोलिसांचा देखील समावेश करावा-पालकमंत्री छगन भुजबळ

*‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत पोलिसांचा देखील समावेश करावा- छगन भुजबळ*

येवला प्रतिनिधी युसुफ पठाण – ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा, अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज येवला शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री श्री. भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल पाटील, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनंत पवार, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता देवरे, महावितरणचे कार्यकारी राजाराम अभियंता, उपअभियंता प्रजापती, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड,गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख,सहायक निबंधक एकनाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, तालुका पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे आदी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, माझे कुटुंब माझे जबाबदारी मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करणाऱ्या पथकामध्ये पोलिसांचा देखील समावेश करावा. प्रत्येक घरा घरात जाऊन माहिती संकलित करावी. तसेच तपासणीस विरोध व
माहिती लपविणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. कोमॉर्बीड रुग्णांची या मोहिमेत अधिक काळजी घ्यावी. सर्वेक्षणाचे काम थांबता कामा नये ते सातत्याने सुरू ठेवावे. खाजगी डॉक्टरांशी समन्वय ठेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती दररोज संकलित करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले आहेत.

येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून यातील काही भाग कोविड सेंटर मध्ये रूपांतरित करावा, माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेत प्रशासनासोबत नागरिकांची देखील महत्वाची जबाबदारी आहे, मोहिम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेण्यात यावी. लक्षणे असलेल्या व्यक्तींची प्राधान्याने कोरोनाची चाचणी करण्यात यावी. यासाठी खाजगी डॉक्टरांनाही सूचना देण्यात याव्यात. लोकांमधील कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. लग्न व इतर समारंभासाठी नियमभंग करून अधिक गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, मोठ्या गावांमध्ये कोविड तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे अशा सूचना दिल्या. यावेळी शेतकरी पीक कर्जाबाबत आढावा घेण्यात आला.

*येवला उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी*

पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी येवला उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. तसेच रुग्णवाढ लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात विभागणी करून कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना दिले.

About Shivshakti Times

Leave a Reply

Your email address will not be published.