प्रतिनिधी – रफिक शाह
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमदारांसोबत बैठक, विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तर राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडून केलेल्या कार्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर.
मुंबई, दि. २८ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आज मुंबईत पार पडलेल्या शिवसेना आमदारांच्या विभागवार बैठकीत विविध विकास कामाबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या आतापर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला.
राज्यात सुरू असलेल्या लोकहिताच्या कामात अनेक अडचणी येत असतात, अशावेळी विकास कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता आमदारांना येत असलेल्या विविध समस्या आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाणून घेतल्या. त्यासाठी शिवसेना पक्षाच्या आमदारांची विभागवार बैठक घेण्यात आली. यामाध्यमातून मतदार संघातील अडचणी समजून घेत विकास कामे मार्गी लागावीत म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यादरम्यान राज्यमंत्री यड्रावकर यांनी कोविड काळात राज्यात करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विविध कार्याबद्दल मुख्यमंत्री यांना माहिती दिली. तसेच मतदार संघात राबविलेल्या योजना आणि विविध विकास कामांबद्दल सांगितले. याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांचे कौतुक करीत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विकास कामांना गती मिळेल आणि अधिक उत्साहाने लोकहिताची कामे करता येतील असे या बैठकीबद्दल बोलताना राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले.