शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी – युसूफ पठाण )
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील लोनी विधानसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे आमदार नंद किशोर गुर्जर हे पुन्हा एखदा चर्चेत आले आहेत. हाथरस प्रकरणामध्ये एकीकडे उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर चहुबाजूंनी टीका होत अशतानाच दुसरीकडे भा.ज.पा.च्या आमदारानेच या प्रकरणामध्ये विरोधी भूमिका घेत थेट राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. हाथरस येथे झालेल्या घटनेसाठी उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक, हाथरसचे जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिक्षकांविरोधात कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नंद किशोर गुर्जर यांनी या पत्रामधून केली आहे. नंद किशोर गुर्जर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना पत्र न लिहिता थेट राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भा.ज.पा.अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि उत्तर प्रदेशचे भा.ज.पा.उपाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना पाठवली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही पहिलीच अशी घटना आहे जिथे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन एक गंभीर गुन्हा आणि भयंकर पद्धतीने करण्यात आलेल्या हत्येतील पीडितेच्या कुटुंबाला विश्वासात न घेता कारवाई करण्यात आली. पीडितेच्या कुटुंबियांचे मूलभूत हक्कही त्यांना नाकारत त्यांना मुलीच्या पार्थिवाला खांदा आणि मुखाग्निही देऊ दिला नाही असं नंद किशोर गुर्जर यांनी पत्रात म्हटलं आहे. देशभरामध्ये भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी करोना कालावधीमध्ये चांगलं काम करुन लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र उत्तर प्रदेशमधील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांमधील संबंधांमुळे पक्षाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.