शिवशक्ती टाइम्स न्यूज – युसूफ पठाण
ठाणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, आर्थिक कारणे, उधारीचे पैसे या कारणांवरून ठाण्यात गेल्या दीड महिन्यांमध्ये नातेसंबंधातील हत्येचे प्रकार वाढलेले आहेत.
ठाणे आणि भिवंडी शहरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे सात प्रकार उघडकीस आले आहेत.
समोरील व्यक्तीविरोधात मनात साठून असलेला राग आणि करोनामुळे आलेला मानसिक तणाव यांमुळे हे प्रकार व्यक्तीच्या हातून घडत असल्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर गुन्हेगारीचा घसरलेला आलेख आता पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे.
मात्र, यासोबतच एक चिंताजनक बाबही निदर्शनास येऊ लागली आहे.
गेल्या दीड महिन्यांत ठाणे, भिवंडी या शहरांत नातेसंबंधातून झालेल्या हत्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
असे सात प्रकार शहरांमध्ये घडले आहेत.
या हत्यांमध्ये आरोपी हे मृतांचे मित्र आणि पती असल्याचे समोर आले आहे.
आपआपसातील वादामुळेच रागाच्या भरात अनेकांनी हत्येचा गुन्हा केला असल्याचे पोलीस सांगतात, तर करोनाचा तणाव तसेच अनेक दिवसांपासून समोरील व्यक्तीविषयी मनामध्ये साठून असलेला राग यांमुळे हे प्रकार घडत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश वेलणकर यांनी सांगितले.
त्यासाठी अशा व्यक्तीनी आपण स्वत: तणावात असल्याचे मान्य करून उपाय करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.