नाशिक (दि.२९) – दिवाळी सणामुळे शहरातील बाजारपेठेत गर्दी होऊ लागली असून कोरोना रुग्णात वाढ होणाची शक्यता वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील दहा हजार दुकानात व इतर दर्शनी भागात स्टिकर्स लावून राबविलेला “नो मास्क, नो एन्ट्री” चा उपक्रम नाशिक महापालिका राबवित आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव कमी होत असला तरीही दिवाळी सणाच्या काळात त्याची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. शहरात काही नागरिक विना मास्क घराबाहेर पडत असून त्यांच्यात जनजागृती व्हावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी राबविलेल्या “नो मास्क, नो एन्ट्री” या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. परंतु आता दिवाळीचा सण आल्याने खरेदी करण्यासाठी बाजारपेठा पुन्हा फुलू लागल्या आहेत. खरेदी करताना नागरिकांमध्ये मास्क व सॅनिटाझरचा वापर करण्याचे भान राहत नाही. तसेच दिवाळीच्या काळात अनेक दुकानांत गर्दी होत असल्याने फिजिकल डिस्टसिंग नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना विषाणू अद्यापही असल्याने आपले कुटुंब आपली जबाबदारी हे भान ठेऊनच प्रत्येक नागरिकांने घराबाहेर पडले पाहिजे. तसेच प्रत्येक दुकानदाराने दुकानात आलेल्या ग्राहकास मास्क व सॅनिटाझरचा वापर करण्याचा आग्रह केला पाहिजे. नाशिक मध्ये कोविड-१९ चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी व दुकानात “नो मास्क, नो एन्ट्री” चे दहा हजार स्टिकर्स लावून जनजागृती केली होती. व या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. परिणामी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली. दिवाळी सणात खरेदी करते वेळी होणारी गर्दी बघता कोरोना विषाणू पुन्हा आपले डोके वर काढेल व त्यातून कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून नाशिक महानगरपालिका “नो मास्क, नो एन्ट्री” उपक्रम राबवित असून नागरिकही यास उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असा विश्वास यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रसिद्ध पत्रकातून व्यक्त केला आहे.