Breaking News

कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करावी : कृषी मंत्री दादाजी भुसे

ग्राम बीजोत्पादन योजनेचा मंत्री भुसे यांच्या हस्ते शुभारंभ

संपादक – जयेश रंगनाथ दाभाडे (सोनार)

मालेगाव, दि. 31 (उमाका वृत्तसेवा) : शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजूरांची कार्यक्षमता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. सध्याच्या पिक पध्दतीमध्ये शेतीची अनेक कामे ही कौशल्यावर आधारीत आहेत. औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी ही कामे वेगवेगळ्या भागात वेगवेगळया पध्दतीने मजूर वर्गाला जर व्यवस्थित कौशल्य प्रशिक्षण दिले तर त्यांच्या कामांची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास निश्चित मदत होईल. यासाठी तालुक्यात आत्मा सन 2020-21 मध्ये 5 कौशल्य आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यामधील प्रशिक्षीत शेतमजुरांनी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

तालुक्यातील तळवाडे येथील डाळींब या पिकांसाठी छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या 50 शेतमजूरांसाठी 30 व 31 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त धिरज कुमार, कृषी संचालक डॉ.नारायण शिसोदे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी सुनिल वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत फळरोपवाटीका निळगव्हाण येथे कापूस व मका, डाळींब पिकांवर फवारणी करणाऱ्या शेतमजूरांसाठी प्रशिक्षण माहे ऑगस्ट 2020 मध्ये संपन्न झाले. या प्रशिक्षणात 50 कौशल्य आधारीत काम करणारे शेतमजूर उपस्थित होते. त्यांनतर चिंचावड येथे शेवगा पिकाची छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजूरांसाठी कौशल्य आधारीत प्रशिक्षण माहे ऑक्टोबर 2020 मध्ये संपन्न झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमात 55 कौशल्य आधारीत कामे करणारे शेतमजूरांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व प्रशिक्षीत शेतमजुरांनी त्यांच्या कौशल्यावर आधारित स्वतंत्र ओळख निर्माण करून समुह गट तयार करण्याचे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

कृषी विभाग अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सदैव प्रयत्नशील : ना.दादाजी भुसे

कृषी विभागातील कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना मार्गदर्शन करित आहेत. जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी वर्ग मोठा आहे. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांशी समन्वय साधून लिलाव प्रक्रियेची कोंडी फोडण्यात काही अंशी यश मिळाले आहे. व्यापाऱ्यांकडील कांदा साठवण क्षमता वाढीसाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच घालून दिलेले निर्बंध शिथील करण्यात येतील असा विश्वासही मंत्री श्री.भुसे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित ग्राम बीजोत्पादन योजनेचा शुभारंभ

महाबीज च्या माध्यमातून दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. बियाणे वाटपात शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून जवळपास 68 कोटी रुपयांची मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनाने केले आहे. यापुढेही अधिकाधिक दर्जेदार बियाणे महाबीज च्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील असेही मंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले. दाभाडी येथे प्रातिनीधीक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना बियाण्याच्या गोणीचे वितरण मंत्री श्री.भुसे व कृषी आयुक्त धिरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. ना नफा ना तोटा तत्वावर जवळपास 800 क्विटंल बियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याचे यावेळी प्रमोद निकम यांनी प्रास्ताविकातून सांगितले. प्रारंभी दाभाडी येथे विकेल ते पिकेल या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजीपाला स्टॉलचे लोकार्पण मंत्री श्री.भुसे व कृषी आयुक्त धिरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांनी समुह शेतीसाठी एकत्रीत होण्याचे आवाहन

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना पुढील काळात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांमार्फत राबविण्याचा मानस आहे. यामुळे समूह शेतीला चालना मिळणार असल्याचे मंत्री श्री.भुसे म्हणाले, यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होऊन समूह शेती साठी एकत्रित येण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याच बरोबर महिला शेतकऱ्यांसाठी देखील प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याच्या सुचना त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोलतांना कृषी आयुक्त धिरज कुमार म्हणाले, कृषी संजीवनीसोबतच रानभाज्यांचा प्रकल्प कृषी विभागामार्फत राबविण्यात आला आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डी मार्ट प्रमाणेच कृषी मार्ट संकल्पना उदयास येत असून हे कृषी विभागासह सर्व शेतकऱ्यांना शुभ संकेत आहेत. परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा अहवाल कृषी विभागामार्फत शासनास सादर करण्यात आला आहे. विमा कंपन्यांशी देखील पाठपुरावा सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना मदत देवून दिलासा देण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या शेतमजुरांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षीत शेतमजुरांना प्रमाणपत्राचे वाटप

तळवाडे येथे आयोजित डाळींब पिकांसाठी छाटणी व विविध मशागतीची कामे करणाऱ्या शेतमजुरांना प्रमाणपत्राचे वाटप कृषी मंत्री दादाजी भुसे व कृषी आयुक्त धिरज कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात शेतमजुर नामदेव सोनवणे, बाळु हिरे, दिपक गायकवाड, महिपत धुडकू यांना प्रमाणपत्र व सोलर लॅम्पचे वाटप करण्यात आले. सौर उर्जेचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीला सोलर कुकरचे वाटपही यावेळी करण्यात आले.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.