शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण
नागपूर : एक डिसेंबरपासून नागपुरात प्रस्तावित विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आता सात डिसेंबरपासून मुंबईतच घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत झाल्याने अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त सरकारी यंत्रणा आणि पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीमुळे करोनाची साथ पसरण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता, हे येथे उल्लेखनीय.
करोनासाथीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अधिवेशन घेऊ नये, असा सूर होता.
साथ जोरात असताना राज्यातील सर्वाधिक बाधित शहरांमध्ये नागपूरचा समावेश होता.
आताही साथ संपली नाही.
९ नोव्हेंबपर्यंत शहरात बाधित रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार १४५ होती.
अजूनही दिवसाला १०० ते २०० बाधित सापडत आहेत.
मृत्यू दर २.९१ इतका आहे.
या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले तर कमी झालेला करोना संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे, याकडे वैद्यकीय यंत्रणेने सरकारचे लक्ष वेधले होते.
विधिमंडळ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढवा बैठकीतही ही बाब ठासून सांगण्यात आली होती.
अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रालयाची संपूर्ण यंत्रणा नागपूरमध्ये हलवण्याचे मोठे आव्हान करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनापुढे होते.
मुंबईतून येताना कर्मचारी बाधित झाले तर ?
हा प्रश्न होताच.
त्यामुळे सरकारचा कलही अधिवेशन मुंबईतच घेण्याकडे होता.
स्थानिक यंत्रणेनाही अनुकूल नव्हती.
या सर्वाचा विचार करून अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कामकाज सल्लागार समितीने घेतला.
अधिवेशन काळात मोर्चे, आंदोलने मोठय़ा प्रमाणात होतात.
यानिमित्त संपूर्ण राज्यातील लोक नागपुरात येतात.