समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय
प्रतिनिधी -युसूफ पठाण
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबईमध्ये करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून या पाश्र्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यांवर भाविकांची गर्दी होऊ नये याबाबत पोलिसांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे.
त्याचबरोबर छटपूजेसाठी परवानगी मागणाऱ्या संस्था, संघटनेस कृत्रिम तलाव बांधण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
त्याच धर्तीवर पालिकेने आता छटपूजेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
येत्या २० आणि २१ नोव्हेंबर रोजी छटपूजा होऊ घातली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील समुद्रकिनारा, तलाव, नदी किनाऱ्यांवर मोठय़ा प्रमाणावर छटपूजेचे आयोजन करण्यात येते.
छटपूजेच्या निमित्ताने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी भाविक मोठय़ा संख्येने तेथे उपस्थित राहतात.
मात्र यंदा करोनाच्या पाश्र्वभूमीवर छटपूजेनिमित्त होणारी गर्दी धोकादायक ठरू शकते.
त्यातच मुंबईत करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या बाबी लक्षात घेऊन यंदा समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजेचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात काढले.
छटपूजेसाठी परवानगी मागणाऱ्या संस्थेला स्वखर्चाने कृत्रिम तलाव बांधण्याची परवानगी द्यावी.
मात्र छटपूजेसाठी उपस्थित राहणाऱ्या भाविकांना सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.
तसेच कृत्रिम तलाव बुजविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेवरच राहील.