प्रतिनिधी – युसूफ पठाण
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मुंबई : महसूल गुप्तचर संचलनालयाने (डी.आर.आय.) तीन दिवसांत मुंबई, नवी मुंबई आणि उदयपूर येथे कारवाई करून कोकेन तस्करांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचे भारतीय हस्तक गजांआड केले.
यात मुंबईतील दोन महिलांचा समावेश असून नवीमुंबई येथून दोन
आफ्रिकन तरुणांना अटक करण्यात आली.
या कारवाईत अर्धा किलो उच्च प्रतिचे कोकेन हस्तगत करण्यात आले.
हा साठा इस्त्रीत दडवून एअर कागरेद्वारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर काढण्याची धडपड या टोळीकडून सुरू होती.
डी.आर.आय. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्रिनिदाद-टोबॅगो येथून इस्त्रीचे पार्सल एअर कागरेमार्फत मुंबई विमानतळावर पाठविण्यात आले असून त्यात कोकेनचा साठा आहे, अशी नेमकी माहिती उपलब्ध झाली होती.
त्याआधारे पार्सल विमानतळावर उतरताच झाडाझडती घेण्यात आली.
तेव्हा इस्त्रीत दडविण्यात आलेला सुमारे अर्धा किलो कोकेन साठा आढळला.
तो हस्तगत करण्याऐवजी हे पार्सल घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीसाठी सापळा रचण्यात आला.
हे पार्सल घेण्यासाठी संबंधीत कुरिअर कंपनी कार्यालयात आलेल्या मुंबईतील महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
हे पार्सल नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या दोन आफ्रिकन तरुणांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तिच्यावर होती, अशी माहिती डी.आर.आय. अधिकाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार नवीमुंबईत सापळा रचण्यात आला.
कोकेन साठा घेण्यासाठी महिलेकडे आलेल्या
आफ्रिकन तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
हा प्रसंग पाहून त्याचा साथीदार रिक्षातून पसार झाला.
त्यालाही पाठलाग करून पकडण्यात आले.
तिघांच्या चौकशीतून उदयपूर येथील एका रिसॉर्टवर थांबलेल्या मुंबईतील दुसऱ्या महिलेला डी.आर.आय.च्या गुजरात पथकाने अटक केली.