शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण )
बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली असून बाजारपेठांना लग्नसराईचा साज चढू लागला आहे.
विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरांतील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत.
साडय़ा, बस्ते, तयार कपडे, दागिने, फर्निचर, सौंदर्याची साधने अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.
करोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लग्नसमारंभ साजरा करण्यावरही र्निबध आले होते.
सुरुवातीच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत टाळेबंदीचे नियम अधिक कडक असल्यामुळे या काळात आयोजित केलेले विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले होते.
अनेकांच्या लग्नाच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या.
मात्र, करोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यत करोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असून टाळेबंदीतही शिथिलता आली आहे.
त्यामुळे तुळशी विवाहानंतर पुन्हा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे.
त्यातच डिसेंबर महिन्यात लग्नाचे दहा मुहूर्त आले आहेत.
त्यामुळे करोनाकाळात पुढे ढकलण्यात आलेले लग्न समारंभ आता या तारखांच्या मुहूर्तावर आयोजित करण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे.
या लग्नसराईसाठी साडय़ांचे बस्ते, तयार कपडे, दागिने, फर्निचर, सौंदर्याची साधने तसेच विविध शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वधू-वराचे कुटुंबीय दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत.