दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी शेतकरी,व्यापारी, कामगारांनी ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हावे – छगन भुजबळ
शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण)
मुंबई/नाशिक,दि.७ डिसेंबर :- केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील लाखो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून पाठींबा जाहीर करण्यात आला असून राज्यभरातील शेतकरी,व्यापारी कामगारांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
याबाबत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने कृषी विषयक काढलेल्या अध्यादेशाबाबत शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे जर शेतकरी हिताचे नसतील तर अशा कायद्यांचा उपयोग काय ? त्यामुळे ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेले हे कायदे रद्द करावेत हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे. या कायद्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा विरोध असून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदमध्येही राज्यातील शेतकरी,व्यापारी, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.