कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार……
नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.
ही घटना कमाल चौक परिसरातील एका चायनिज रेस्टॉरेंटमध्ये दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली.
विवेक पांडुरंग गोडबोले (३५), रा. कपिलनगर मोहसीन ऊर्फ पिंटू किल्लेदार आणि नीलेश शाहू पिल्लेवान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी नवसीन नावाची महिला फरार असून तिचा शोध सुरू आहे.
महेश ऊर्फ गुड्ड दुर्गाप्रसाद तिवारी (३८), रा. गणेशपेठ असे मृताचे नाव आहे.
महेश व विवेक यांचा भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे.
त्यांचे भूखंड बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाल्यावर एकमेकांच्या शेजारी आहेत.
त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या ५ हजार चौरस फूटाच्या भूखंडांवरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
विवेकच्या भूखंडावर गुड्डूने अतिक्रमण केले होते व तो ते रिकामे करून मागत होता.
दोघांमधील वाद विकोपाला गेला होता.
गुरुवारी विवेकने मोहसीन आणि कर्मचारी नवसीन यांना गुड्डला बोलावण्यास पाठवले. दुपारी १ वाजता गुड्ड कमाल चौकात आला.
तेव्हा विवेक, मोहसीन व गुड्ड नीलेश पिल्लेवान याच्या चायनिज रेस्टॉरेंटमध्ये बसले.
या ठिकाणी त्यांच्यात वाद झाला.
या वादात त्यांनी गुड्ड याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर त्यांनी स्टॉरेंटमधील चाकूनेच त्याच्यावर वार करून खून केला.
हा सर्व प्रकार रेस्टॉरेंट चालकाच्या समोर घडला.
तरीही त्यांनी पोलिसांनामाहिती दिली नाही.
त्यामुळे त्यालाही सहआरोपी करून अटक करण्यात आली.
गुड्डला बोलावण्यासाठी जाणाऱ्या तरुणीलाही आरोपी करण्यात आले असून ती वर्धा येथील आहे.