*लाच मागितल्याप्रकरणी महिला सहाय्यक निरीक्षकासह पोलीस नाईकाविरुद्ध गुन्हा*
नाशिक (प्रतिनिधी) युुुसुफ पठाण :- एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या महामार्गावरील गाड्या सुरळीत चालण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागण्याच्या आरोपावरून एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या नाशिक-मालेगाव महामार्गावर 35 गाड्या चालतात. या गाड्यांची अडवणूक न करता हा व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथील महामार्ग पोलीस केंद्र येथे नेमणुकीस असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा कदम व पोलीस नाईक उमेश भास्कर सानप यांनी तडजोडी अंती 8 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची फिर्याद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या नाशिक कार्यालयाकडे दिली.
या तक्रारीवरून दि. 15 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळापूर्व पडताळणी दरम्यान श्रीमती कदम व सानप यांनी फिर्यादीकडे तडजोडी अंती 8 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले म्हणून त्यांच्या विरुद्ध आज ओझर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे