Breaking News

कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश

स्थानिकस्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी
जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा – कृषीमंत्री दादाजी भुसे

सोयाबीन बियाण्यांचे दर शेतकऱ्यांना परवडतील असे ठेवा

पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी – युसूफ पठाण

मुंबई, दि. ११: राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वयाचे काम करावे, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातून बोध घेवुन यंदा पेरणीपूर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके आयोजित करतानाच शेतकऱ्यांमध्ये जाणीवजागृतीसाठी विशेष मोहिम घेण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
आज मंत्रालयात कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर सोयाबीन, कापूस व मका पिकांच्या बियाण्यांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व बियाणे उत्पादकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धिरज कुमार, संचालक दिलीप झेंडे व बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्हानिहाय पीक पध्दती लक्षात घेवून मागणी प्रमाणे त्या त्या पिकांचे बियाणे पुरवठा करण्यावर कंपन्यांनी भर द्यावा. काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने समन्वयाचे काम करावे. त्यासाठी कृषि आयुक्तालय पातळीवर नव्याने स्थापित करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्ष उपयोगी ठरेल.
गेल्या वर्षी मोठया प्रमाणात सोयाबीन बियाणे तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. गतवर्षीच्या अनुभवातुन बोध घेवुन पेरणीपुर्वी गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करण्याची प्रात्यक्षिके जास्तीत जास्त प्रमाणावर आयोजित करावीत. अशा प्रात्यक्षिकां दरम्यान कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषि सेवा केंद्राचे प्रतिनिधी शेतकरी वर्गात जाणीव जागृती निर्माण करण्यास उपलब्ध झाल्यास मोठा सकारात्मक बदल निश्चितच होवुन येणा-या वर्षात बियाणे उगवणशक्तीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होवु शकेल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

सोयाबीन पिकासाठी १० ते २० टक्के अतिरीक्त बियाणे पुरवठा करावा

सर्वच पिकांच्या बियाणे पुरवठा नियोजन आराखडयाप्रमाणे करीत असतांना राज्याकरिता विशेष बाब म्हणुन सोयाबीन या पिकासाठी १० ते २० टक्के जास्तीचा बियाणे पुरवठा करावा असे आवाहन श्री. भुसे यांनी सोयाबीन बिजोत्पादक कंपन्यांना केले. महाबिज कंपनीव्दारे राज्यात सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे गतवर्षीप्रमाणेच ठेवले आहेत. त्यात दरवाढ करण्योत आलेली नाही. याबाबत खाजगी कंपन्यांनी देखील पुढाकार घेवुन त्यांच्या कडील सोयाबीन बियाणे विक्रीचे दर हे शेतकरी बांधवांना परवडतील असे ठेवण्याबाबत आवाहन यावेळी त्यांनी केले.

कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या तक्रारींबाबत संशोधनासाठी पुढाकार घ्यावा

राज्यातील कृषि विद्यापीठांनी सोयाबीन उगवणशक्तीच्या उदभवणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संशोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच उन्हाळी हंगामातील सोयाबीन लागवड यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी हाती घेण्यात आली यावर देखील सविस्तर संशोधन होऊन राज्यातील शेतकऱ्यांना शिफारसी द्याव्यात अशा सुचना त्यांनी दिल्या.

महाबीजने शासकीय प्रक्षेत्रे व कृषि विद्यापीठाकडील प्रक्षेत्रांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त गुणवत्तापुर्ण बियाणे शेतकऱ्यांसाठी उत्पादीत करावे अशी सूचनाही कृषीमंत्र्यांनी यावेळी केली.

यावर्षी पावसाळा वेळेवर आणि नियमीत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करावे. बियाण्यांच्या वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे, असे श्री. भुसे यांनी सांगितले.

यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज

यंदा राज्यात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज असून बियाणे कंपन्यांनी अतिरीक्त बियाणे राज्यासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. कापसावर फवारणी आणि वेचणी करणाऱ्या मजुरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे याकामी बियाणे कंपन्यांनी देखील पुढाकार घ्यावा असे आवाहन करतानाच अन्य राज्यांतून बेकायदा बियाण्यांची विक्री राज्यात विक्री होऊ नये यासाठी कृषि विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या.

About Shivshakti Times

Check Also

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ

अजंग-रावळगाव येथील औद्योगिक भूखंडासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदत वाढ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान

तुम्हाला KYC साठी कॉल किंवा मेसेज आल्यास सावधान-गृह मंत्रालयाचा अलर्ट! आपली बँक रिकामी होऊ शकते …

सिक्स सिग्मा व सनराईज रुग्णालय बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू केल्याप्रकरणी संचालकावर गुन्हा दाखल

मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचा पदभार काढला मालेगाव : प्रतिनिधी कोरोना रूग्णांकडून अव्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *